मुंबई- पश्चिम क्षेत्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल झाले. वातावरणातील धूळ आणि धुके एकत्र मिसळल्याने मुंबईत पसरलेल्या धुरक्यामध्ये वाढ झाली. परिणामी मुंबई दोन दिवस धुरक्यात हरवली.मुंबईवरील धुरके निवळते तोच राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. १० फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.११ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.१२ फेब्रुवारी रोजी विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.९ आणि १० फेब्रुवारी रोजी मुंबईत आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३२, १८ अंशाच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई हरवली धुरक्यात; राज्याला पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 6:14 AM