मुंबई : मुंबईत शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरधारांची नोंद झाली. सोसाट्याचा वारा, मुसळधारांनी नागरिकांची त्रेधातिरपिट उडवून टाकली. पहाटेपासूनच सुरू झालेला पाऊस सकाळचे ११ वाजले तरी कोसळतच होता. विशेषत: कामावर जाण्याच्या वेळेला दाखल झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्यासह वळविण्यात आलेल्या रस्ते वाहतुकीने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.
दक्षिण मुंबई, मध्य मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरी कुर्ला, विद्याविहार, भांडूप, मुलुंडसह बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मालाड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने सकाळी ९ वाजता पुढील तीन तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, मुंबईच्या उपनगरात थांबून थांबून कोसळत असलेल्या पावसाच्या जलधारांनी चहुकडे पाणीच पाणी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला ते अंधेरी रस्ता अशा मुख्य रस्त्यांवर सकाळी पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. दुपारी साडेबारानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.