मुंबई, दि. 20 - मुंबईसह ठाणे-कल्याण आणि वसई-विरार परिसरात पावसाची संततधार मंगळवारपासून ते आज सकाळपर्यंत कायम आहे. पावसानं शहराला अक्षरशः झोडपलं आहे. त्यामुळे लोकलसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मालाड सबवेमध्येही पाणी भरल्यामुळे मंगळवारी रात्री बेस्ट बस पाण्यात अडकली होती. सबवेवर पाणी साचल्यामुळे ही बस थांबवण्यात आली होती. त्यानंतर पावसाचे पाणी वाढत गेल्याने बस अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाली. दुसरीकडे ठाणे शहरात गेल्या 24 तासांत 1069 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जोरदार पावसामुळे ठाणे शहरात टाटा बस (MH 04 G 9930 ) झाड कोसळलं. उर्जित हॉटेल जवळील ही घटना आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
ठाण्यातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात बुधवारी पहाटे पहाटे दोन घरांसह एक टेम्पोवर झाड कोसळले. जुनी म्हाडा कॉलनीमधील ही घटना आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घरांचं किरकोळ नुकसान झाले आहे.