मुंबई : मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त करवाढ करण्याचे टाळले असले तरी उत्पन्नाचे कोणतेही नवीन मार्ग शोधलेले नाहीत. जीएसटीचे केंद्राकडून मिळणारे ११ हजार कोटी, मालमत्ता कर सुमारे सहा हजार रुपये कोटी, पाणीपट्टी आणि विकास प्रकल्प निधीद्वारे पालिकेच्या गंगाजळीत पैसे जमा होणार आहेत.
सन २०२३ - २४ चा ५२ हजार ६१९.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात सादर झाल्यानंतर पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले की, पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ५० हजार कोटींचा टप्पा पार करण्यात आला आहे. मुंबईकरांच्या विकासासाठी हे पैसे खर्च केले जाणार आहेत. नवीन प्रकल्पाबद्दल सांगायचे झाले तर वर्सोवा ते भाईंदर सी लिंक, नवीन मलनिस्सारन प्रक्रिया केंद्र याशिवाय वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी विशेष यंत्र, रस्ता ९ मीटर रुंद असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ धोरण राबविणार आहे. इतकेच नव्हे, तर आरोग्यासाठी शिक्षणासाठी १२ टक्के तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. ३१ मार्च पर्यंत २०८ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक, तर २०२३ - २४ मध्ये २७० एचबीटी क्लिनिक सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.