Mumbai Corona Updates: मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात महानगरपालिकेनं आता अधिक कठोर नियमावली लागू करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील १० वी व १२ वीचे वर्ग वगळता इतर वर्गांच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता पालिकेनं इमारती सील करण्याच्या निर्णयात बदल केला आहे.
रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील केली जाणार आहे. नवीन नियमावली आतापासूनच लागू करण्यात आली आहे. यात ज्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळतील त्या इमारतीतील रहिवाशांसाठी काही नियम पालिकेनं घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
मार्च २०२१ मध्ये महापालिकेच्या सुधारित परिपत्रकानुसार दोन बाधित रुग्ण असल्यास त्या इमारतीचा बाधित मजला आणि पाचहून अधिक रुग्ण असल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे मुंबईतील सील इमारतींचा आकडा ३१८ वर पोहोचला. तर चार हजारांहून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या नियमांमध्ये आता सुधारणा केली आहे.
इमारत सील करण्यासाठी पालिकेचे नवे नियम काय?- इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील करण्यात येणार- आयसोलेट आणि होमक्वारंटाइन असणाऱ्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं- रुग्णांनी लक्षणं लक्षात आल्यापासून कमीत कमी १० दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक असणार आहे. - रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी ७ दिवस होमक्वारंटाइन व्हावं आणि पाच ते सात दिवसांच्या आत कोरोना चाचणी करून घ्यावी. - इमारतीत कोरोना रुग्ण असल्यास संबंधित रुग्ण आणि कुटुंबियांना अन्न, औषध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जाईल याची इमारतीच्या कमिटीनं काळजी घ्यावी. - पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीनं संपूर्ण सहकार्य करावं- इमारतीची सील मधून मुक्तता करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाईल.