मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अखेर बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 12:58 PM2018-10-01T12:58:34+5:302018-10-01T15:11:43+5:30

गोराईनंतर मुलुंड हे मुंबईतील बंद होणारे दुसरे डम्पिंग ग्राऊंड ठरले आहे.

Mumbai BMC shuts Mulund dumping ground from today | मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अखेर बंद!

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अखेर बंद!

googlenewsNext

मुंबई - तब्बल १० वर्षांपासून बंद होण्याच्या प्रतिक्षेत असलेले मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अखेर सोमवारपासून शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 'बायोकल्चर' पद्धतीने कचऱ्याचे विघटन करून येथे खतनिर्मिती केली जाणार आहे. दररोज ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गोराईनंतर मुलुंड हे मुंबईतील बंद होणारे दुसरे डम्पिंग ग्राऊंड ठरले आहे. यामुळे मुलुंड व ठाण्याच्या सीमेवरील हरीओम नगर, तुकाराम नगर परिसरासह इतर भागांनाही दिलासा मिळणार आहे. 

डम्पिंग ग्राऊंड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागत असल्याने देवनार व मुलुंड डम्पिंग परिसरातील नागरिकांनी मागील काही वर्षांत मोठी आंदोलने उभारली. २००८ पासून हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र कंत्राटदारांनी वेळेत प्रकल्प सुरू न केल्याने पालिकेला तोंडघशी पडावे लागले. त्यामुळे जुनी कंत्राटे रद्द करत पालिकेने नव्याने प्रकल्पाची आखणी केली आहे. उच्च न्यायालयाने पालिकेला वेळोवेळी दट्ट्या देत सव्वा वर्षापूर्वी मुंबईत नवीन बांधकामांना बंदी घालून पालिकेची नाकेबंदी केली. त्यावर पालिकेने नवीन प्रकल्प व उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने ही बंदी उठवली असून, नुकतीच एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. 

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची निविदा मंजूर होऊन कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड व इतर घटक वेगवेगळे काढले जाऊन बायोकल्चर पद्धतीने कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. तसेच मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर सध्या मोठ्या प्रमाणात कचरा असून, कंत्राटदार कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून डम्पिंगची जमीन पालिकेला कचरामुक्त करून देणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग कंत्राटदाराच्या ताब्यात दिले जाणार असल्याचंही शंकरवार यांनी सांगितले. 

Web Title: Mumbai BMC shuts Mulund dumping ground from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई