व्हिस्कीचे १२ लार्ज पेग, फेक आयडी अन् बरंच काही...मिहीर शहानं काय काय केलं? सगळं समोर आलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 06:02 PM2024-07-11T18:02:38+5:302024-07-11T18:33:41+5:30
worli hit and run: वरळी हिट अँड रन प्रकरणात फरार आरोपी मिहीर शहा याला अटक झाल्यानंतर आता याप्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत.
वरळी हिट अँड रन प्रकरणात फरार आरोपी मिहीर शहा याला अटक झाल्यानंतर आता याप्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. मिहीर शहा यानं आपल्या मित्रांसोबत जुहू येथील ज्या तापस बारमध्ये पार्टी केली होती तिथं मिहीर आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून व्हिस्कीचे १२ लार्ज पेग घेतले होते. त्यांनी भरलेल्या बिलातून ही माहिती समोर आली आहे. यात प्रत्येकाने चार लार्ज पेग घेतले असं सांगितलं जात आहे. इतकंच नव्हे, तर बारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मिहीर शहा यानं आपलं वय २७ वर्ष असल्याचा खोटा आयडी बारच्या कर्मचाऱ्यांना दाखवला होता. संबंधित बार कर्मचाऱ्यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे.
मिहीर आणि त्याच्या मित्रांचे आयडी कार्ड बारमध्ये प्रवेशावेळी तपासण्यात आले होते. मित्रांचे वय ३० वर्षाहून अधिक होते. तर मिहीरनं दाखवलेल्या आयडी कार्डवर त्याचं वय २७ वर्ष नमूद होतं असा दावा बारच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासोबतच मिहीरनं त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरही त्याचं वय २७ वर्ष असल्याचं नमूद केल्याचं सांगितलं जात आहे. पण मिहीर शहा २४ वर्षांचा आहे. त्यामुळे मद्यप्राशन करण्यासाठी मिहीरनं बनावट आयडी कार्डचा आधार घेतल्याचा आरोप आहे.
प्रत्येकी चार लार्ज पेग असं गृहित धरलं तरी हे प्रमाण एखाद्या व्यक्तीला पुढील ८ तासांसाठी नशेत ठेवू शकतात असं राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मिहीर आणि त्याचे मित्र मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास बारमधून बाहेर पडले होते. तर घटना पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास घडली होती. म्हणजे मद्यप्राशन केल्यानंतर पाच तासांच्या आतच घटना घडली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ग्लोबल तापस बारचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. या घटनेसोबतच अधिकाऱ्यांना या बारच्या व्यवस्थापनातही काही अनियमीतता दिसून आली आहे. तर मनपानं बारच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला आहे.
मिहीरनं जुहूच्या ग्लोबल तापस बारमध्ये पार्टी केल्यानंतर बोरीवली येथील दुसऱ्या एका बारमध्ये जाऊन पुन्हा मद्यप्राशन केल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. बोरीवलीमधील या बारचा तपास आता केला जात आहे. याप्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होत आहेत. मिहीर याला शिवडी न्यायालयानं १६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच त्याचा ड्रायव्हर राजरिषी बिडावत देखील पोलीस कोठडीत आहे आणि मिहीरला पळून जाण्यात मदत केलेले राजेश शहा सध्या जामीनावर सुटले आहेत.