Join us  

वरळी हिट अँड रन प्रकरण: मुख्य आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 3:57 PM

मूळ अपघात झाल्यानंतर तब्बल ६० तासांनी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली होती

Mihir Shah Police Custody, Worli Mumbai Hit and Run Case: वरळीच्या अट्रिया मॉलजवळ घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ७ जुलैला पहाटे वरळीत मिहीर शाह याने नाखवा दाम्पत्याला उडवले होते. त्यानंतर तब्बल ६० तासांनी मंगळवारी शाहपूरमधून मिहीरला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याबाबत कबुली दिल्यानंतर सुरुवातीला त्याला १६ जलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानुसार त्याला आज शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

मिहीर शाहने अपघातानंतर आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मोबाईल बंद करून तो फरार झाला. अखेर मंगळवारी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी आपणच कार चालवत असल्याचे त्याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले असल्याची माहिती आहे. २४ वर्षीय मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कावेरी नाखवा यांना फरफटत नेताना शेजारून जाणाऱ्या कार चालकांनी मिहीर शहाला थांबण्याचा इशारा दिला. मद्यधुंद अवस्थेत निघालेल्या मिहीरने लक्ष दिले नसल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे. वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला उडवल्यानंतर प्रदीप नाखवा एका बाजूला कोसळल्याचे दिसले. मात्र महिला गाडीच्या चाकात अडकल्याचे दिसले नसल्याचा दावा मिहीरने केला आहे. काही अंतरानंतर स्पीड ब्रेकर आल्याने गाडीत काहीतरी अडकल्याचे समजताच त्याने गाडी थांबवली. सीसीटीव्हीमध्ये ५:२५ ला अपघात झाल्यानंतर ५:३१ ला गाडी थांबल्याचे दिसून आले.

टॅग्स :अपघातमुंबईन्यायालय