मुंबई - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या ताफ्यातील एका बोटीला अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले असून मृत तरुणाच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
मुंबईनजीकच्या समुद्रात राज्य सरकारच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन व अन्य अधिकारी बोटीने आज दुपारी जात होते. त्यावेळी एका बोटीला अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू ओढवला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेची राज्य सरकार चौकशी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.