खवळलेल्या समुद्रात ३० मिनिटं खांद्यावर होतं १४ महिन्यांचं बाळ; आईने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:57 IST2024-12-19T17:56:33+5:302024-12-19T17:57:22+5:30

एक १४ महिन्यांचं बाळ जवळपास ३० मिनिटं समुद्रात आपल्या मामाच्या खांद्यावर असल्यामुळे वाचलं आहे. यावेळी नेमकं काय घडलं हे वैशाली अडकणे यांनी सांगितलं.

mumbai boat ferry accident mother held 14 months old son in sea | खवळलेल्या समुद्रात ३० मिनिटं खांद्यावर होतं १४ महिन्यांचं बाळ; आईने सांगितलं नेमकं काय घडलं?

खवळलेल्या समुद्रात ३० मिनिटं खांद्यावर होतं १४ महिन्यांचं बाळ; आईने सांगितलं नेमकं काय घडलं?

मुंबई बोट दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वैशाली अडकणे याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सुदैवाने जीव वाचला आहे. याच दरम्यान एक १४ महिन्यांचं बाळ जवळपास ३० मिनिटं समुद्रात आपल्या मामाच्या खांद्यावर असल्यामुळे वाचलं आहे. यावेळी नेमकं काय घडलं हे वैशाली अडकणे यांनी सांगितलं. वैशाली यांच्या भावाने एका हाताने बोट पकडली आणि बहिणीच्या लहान मुलाला आपल्या खांद्यावर घेतलं होतं. 

"कुटुंबातील आठ जण आम्ही फिरायला आलो होतो. बोटीत बसलेलो असताना नौदलाची स्पीडबोट धडकली तेव्हा जोरात धक्का बसला, पण थोडा वेळ बोट नीट सुरू होती. त्यानंतर चालकाने सर्वांना लाईफ जॅकेट घालण्यास सांगितलं. ज्यांना जसं लाईफ जॅकेट मिळालं त्यांनी तसं ते पटापट घातलं. पण काही जणांना जॅकेट मिळालं नाही. काही वेळाने बोट एका बाजूला झुकली आणि नंतर ती बुडू लागली."

"काही लोक बोटीखाली अडकले. आम्हीही बोटीला पकडलं होतं आणि समुद्रात पोहत होतो. मृत्यू समोर उभा होता. मला माझा १४ महिन्यांचा मुलगा शर्विलला कोणत्याही किंमतीत वाचवायचं होतं. माझ्या भावाने माझ्या मुलाला खांद्यावर घेतलं आणि तो स्वतः पाण्यात होता. आजूबाजूला फक्त पाणीच पाणी होतं. ३० मिनिटं आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही."

"काही वेळाने २-३ बोटी आमच्या दिशेने आल्या, बोटी अजून ५ ते १० मिनिटं उशिरा आल्या असत्या तर आमचा मृत्यू झाला असता. एका परदेशी जोडप्याने अनेकांना बुडण्यापासून वाचवलं. या जोडप्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ७ जणांचा जीव वाचवला" असं वैशाली यांनी म्हटलं आहे. वैशाली अडकणे यांचं कुटुंब एलिफंटा येथून परतत होतं. त्या कुर्ला येथील रहिवासी आहेत. 
 

Web Title: mumbai boat ferry accident mother held 14 months old son in sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई