मुंबई : उंच इमारतींच्या भिंतीवरून चढून खिडकीवाटे घरात शिरून घरफोडी करणाºया आनंद सकपाळ (२०), गणेश देवकर (२०) या दुकलीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. त्यांनी आतापर्यंत ११ घरफोडीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ८५ हजार किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरात उंच इमारतींच्या खिडकीतून प्रवेश करत घरफोड्या करण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विलास दातीर, मैत्रानंद खंदारे, अशोक भोसले आणि अंमलदार यांनी यासंदर्भात तपास सुरू केला. या तपासात पथकाला या आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या झडतीत तब्बल ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.आरोपींनी घाटकोपरसह कांदिवली, एन.एम. जोशी मार्ग, माटुंगा, वर्सोवा, गोरेगाव, बीकेसी परिसरात ११ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी आतापर्यंत १००हून अधिक गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मुंबईत सराईत घरफोडी करणाऱ्या दुकलीला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:51 AM