मुंबईः रेल्वेपुलांच्या देखरेखीची जबाबदारी मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन या दोघांची आहे. या पुलांच्या दुरवस्थेससुद्धा हे दोघेच जबाबदार आहेत. असे असताना सुद्धा ते आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. हे मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे, असे विधान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत काढले.मुंबई लोअर परेल येथील रहदारीस धोकादायक असलेल्या बंद केलेल्या रेल्वेपुलाला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, सन 2012 आणि 2016 मध्ये मुंबई महापालिकेने मुंबईतील रेल्वेपुलांचे ऑडिट केले होते. या ऑडिटच्या अहवालानुसार मुंबईतील 6 पूल जीर्णावस्थेत असल्याचे समोर आले होते. त्यामध्ये एल्फिस्टन रेल्वे पूल, दादर येथील टिळक ब्रिज, लोअर परेल येथील रेल्वे पूल, करीरोड येथील रेल्वे पूल, मशीद बंदर येथील रेल्वे पुलाचा समावेश होता. हे पूल 100 वर्षे जुने आहेत. पण मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन दोघांनीही यांच्या देखभालीकडे लक्ष दिलेले नाही, जी त्यांची जबाबदारी आहे.लोअर परेल येथील रेल्वे पुलावरून दररोज हजारो लोक पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतात. हजारो वाहने या करी रोडवरून वरळी किंवा लोअर परेल पश्चिमेकडे जायला या पुलाचा वापर करतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या 4 दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने हा पूल बंद केला आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोअर परेल स्थानकावर जाण्यासाठी आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे लाखो पादचारी लोक यामुळे प्रभावित झाले आहेत. येथील पादचारी रेल्वे पुलावर या गर्दीचा खूप ताण पडत आहे. हा पूल बंद करण्याअगोदर रेल्वेने कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे एल्फिस्टन रोड रेल्वे पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या अपघातासारखी घटना येथेसुद्धा होऊ शकते. म्हणून रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने एकमेकांवर दावे आणि प्रतिदावे न करता एकत्र येऊन लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि गर्दीच्या वेळेस एल्फिस्टन रेल्वे पुलावर झालेल्या अपघातासारखी परिस्थिती उद्भवू नये, याची खबरदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
मुंबईतले पूल मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कोसळतायत - संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 9:57 PM