Mumbai Building Collapse : निष्काळजी भोवली; मालाडमध्ये बांधकाम कोसळून १२ जणांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 07:41 AM2021-06-11T07:41:38+5:302021-06-11T07:42:32+5:30
Mumbai Building Collapse : दुर्घटनेनंतर रात्रीच मदतकार्याला सुरूवात करण्यात आली. मध्यरात्रीपासून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले व रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : मालाड पश्चिमेच्या मालवणी गेट नंबर ८ येथील तीन मजली रहिवासी बांधकामाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला; तर ६ जण जखमी झाले. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सहा पुरुष, सहा महिलांचा समावेश असून, यातील आठ लहान मुले आहेत.
हे बांधकाम पाच-सहा वर्षांपूर्वीचे आहे. मात्र नंतर त्याला तडे गेले होते आणि काही भाग कलंडला होता. मात्र तेव्हा घरमालकाने भेगांमध्ये सिमेंट भरून डागडुजी केली. पालिका अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळावेळीही बांधकामाला तडे गेले होते. तेव्हाही दुर्लक्ष करून बांधकामात बदल केल्याने ते कोसळल्याचा आणि १२ जणांचा बळी गेल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दुर्घटनेनंतर रात्रीच मदतकार्याला सुरूवात करण्यात आली. मध्यरात्रीपासून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले व रूग्णालयात दाखल करण्यात आले. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दुर्घटनेतील ६ जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यातील मरिकुमारी हिरागन्ना यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ७ लाखांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५०
हजार रुपयांची मदत जाहीर केली.
बिल्डरला अटक
घराचा मालक रफिक सिद्दीकी याने बांधकाम व्यावसायिक रमजान नबी शेख याच्याशी संगनमत करून हे अनधिकृत घर बांधले. तौक्ते वादळाने इमारतीला तडे गेलेले असताना दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडली. याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली आहे.
मृतांची नावे
साहिल सरफराझ सय्यद (९), आरिफ शेख (९), शफिक सालेम सिद्दीकी (४५), तौसिफ शफिक सिद्दीक (१५), अलिशा शफिक सिद्दीकी (१०), अल्फिसा शफिक सिद्दीकी (१.५), अल्फिना सिद्दीकी (६), इशरत बानो शफिक सिद्दीकी (४०), रहिसा बानो सफिक सिद्दीकी (४०), ताहेस सफिक सिद्दीकी (१२) व जोहन इरन्ना (१३), एकाची ओळख पटलेली नाही.
...तर दुर्घटना टळली असती
मालाड मालवणीतील चारमजली रहिवासी बांधकाम पाच ते सहा वर्षांपूर्वीच बांधले होते. त्याला तडे गेल्यानंतर बांधकामाचा काही भाग कलंडला होता. वेळीच रहिवाशांना घर खाली करायला लावून दुरुस्तीचे काम करून घेणे गरजेचे असताना घरमालकाने त्यातील भेगांमध्ये सिमेंट भरून वरवरची डागडुजी केली. वेळीच लक्ष दिले असते, तर दुर्घटना टळली असती, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.