Mumbai Building Collapse : अख्खी रात्र आम्ही पावसात काढली; ना कोणी जेवण विचारले ना पाणी...,
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 10:29 AM2021-06-12T10:29:07+5:302021-06-12T10:29:33+5:30
Mumbai Building Collapse: एका तरुणाने सांगितले, र्घटनेस घरमालक, कंत्राटदार, अधिकारी जबाबदार आहेत. पालिकेने ऑडिट करणे गरजचे आहे. सरकारने मदत करायला हवी.
मुंबई : मालाड येथील बांधकाम बुधवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले. बांधकामाचा राडारोड उचलण्याचे काम शुक्रवारीही सुरूच हाेते. काही किरकोळ जखमींनी गुरुवारची रात्र भर पावसात काढली. त्यांना ना कोणी जेवण विचारले, ना पाणी. संसार उघड्यावर पडले असून, मायबाप सरकार काय मदत करणार, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.
एक किरकोळ महिला जखमी म्हणाली, मी जेवण बनवत होते. अचानक डोक्यावर बांधकाम पडले. मार लागला. माझ्या मुलांनी उपचार केले. रात्रभर आम्ही काही खाल्ले नाही. भर पावसात बाहेर आहोत. निवारा नाही. सरकारने काहीतरी करावे.
एका तरुणाने सांगितले, र्घटनेस घरमालक, कंत्राटदार, अधिकारी जबाबदार आहेत. पालिकेने ऑडिट करणे गरजचे आहे. सरकारने मदत करायला हवी.
एका किरकोळ जखमी महिला म्हणाली, १८ तारखेला माझे लग्न झाले. मी व पती जेवण करून झोपलो होतो. अचानक अंगावर बांधकाम कोसळले. आम्हाला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मुका मार लागला आहे. संसार उद्धवस्त झाला आहे. काहीच वाचले नाही.
४ जणांना डिस्चार्ज
मालाड येथील दुर्घटनेत १९ जखमींपैकी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ७ जखमींवर उपचार सुरू होते. त्यापैकी ४ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, उर्वरित ३ जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शताब्दी रुग्णालयाचे डॉ. सौरभ यांनी दिली.
मृतदेहाची ओळख पटली
मालाड मालवणी परिसरातील दुर्घटनेमध्ये १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १० जून रोजी सायंकाळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. सदर ६० वर्षीय मृतदेहाची ओळख शुक्रवारी पटली असून त्यांचे नाव येसु भाटिया असे आहे.
ठेकेदाराची रवानगी पोलीस कोठडीत
मालाडच्या मालवणीमध्ये एका तळमजला अधिक दोन मजली रहिवासी बांधकामाचा भाग कोसळून १२ जणांचा बळी गेल्याप्रकरणी घर मालकासह ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, अटक करण्यात आलेल्या ठेकेदाराला पोलीस कोठडी सुनावली असून मालवणी पोलीस अधिक तपास करत आहेत.