चेन्नई : विमान प्रवासादरम्यान शेजारी महिला प्रवासी बसलेली असताना मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ पाहणाऱ्या मुंबईच्या उद्योगपतीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, नंतर त्याला सूचना देवून सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या विमानात घडली आहे. हे विमान मुंबईहून 10.55 मिनिटांनी निघाले आणि पात्री 12.50 वाजता चेन्नईला पोहोचले.
विमानामध्ये मडिपक्कम येथील एक महिला लहान मुलासह प्रवास करत होती. महिलेने विमानतळावर उतरल्यावर पोलिसांना सांगितले की तिच्या शेजारील सीटवर बसलेला व्यक्ती मोबाईलवर पॉर्न पाहत होता. तसेच वारंवार तो मोबाईलचा डिस्प्ले तिच्याबाजुला वळवत होता. या बाबतची तक्रार या महिलेने विमानातील कर्मचाऱ्यांकडेही केली होती.
या महिलेच्या तक्रारीनंतर कर्मचाऱ्यांनी या उद्योगपतीला सीट बदलण्यास सांगितले मात्र त्याने नकार दिला. यानंतर फ्लाईट कॅप्टनला त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी यावे लागले. शेवटी महिलेलाच दुसऱ्या जागेवर बसविण्यात आले. तसेच कॅप्टनने चेन्नई विमानतळावर कंट्रोल रुमला याबाबत कऴविले.
विमान मध्यरात्री चेन्नई विमानतळावर उतरताच सीईआयएसएफच्या जवानांनी या उद्योगपतीला ताब्यात घेत विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेने पोलिसांकडे लिखित तक्रार देण्यास नकार देत त्या उद्योगपतीला समजाविण्यास सांगितले. या प्रकारासाठी उद्योगपतीने या महिलेची माफीही मागितली.