मुंबई जगाला मागे टाकू शकेल; लोकमत चेंज मेकर्स पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 11:19 AM2023-04-09T11:19:58+5:302023-04-09T11:20:38+5:30

मुंबईच्या वाहतूक कोंडीत सर्वसामान्य मुंबईकर भरडत आहे. त्यावर उपाय म्हणून आपण कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो लाईन तयार करत आहोत

Mumbai can overtake the world political leaders expressed their confidence at the Lokmat Change Makers Award ceremony | मुंबई जगाला मागे टाकू शकेल; लोकमत चेंज मेकर्स पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई जगाला मागे टाकू शकेल; लोकमत चेंज मेकर्स पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

मुंबई :

मुंबईच्या वाहतूक कोंडीत सर्वसामान्य मुंबईकर भरडत आहे. त्यावर उपाय म्हणून आपण कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो लाईन तयार करत आहोत. जगातील सर्वोत्कृष्ट ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण निर्माण करू शकलो तर जगातील कोणत्याच देशाशी आपली तुलना होऊ शकणार नाही, असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात व्यक्त केले.

आस्क फाउंडेशनच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात या सोहळ्यात नार्वेकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर, भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर, दिग्दर्शक निर्माता केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, नवोदित अभिनेत्री सना शिंदे, टीव्ही पर्सनॅलिटी शिव ठाकरे, आस्क फाउंडेशनच्या प्रमुख अवनी व शंतनू अगस्ती आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान परिसंवादात ‘आयबीएन लोकमत’चे वृत्त निवेदक विलास बडे यांनी विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर यांना बोलते करत सध्याची राजकीय परिस्थिती तसेच मुंबईला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत विचारणा केली.

मात्र, मुंबई स्वतःची ओळख जपणारे शहर आहे. कोणतेही संकट आले तरी त्यातून मार्ग काढत पुढे जाणारे शहर आहे. काल कोण काय बोलले, याला मुंबईकर महत्त्व देत नाहीत; पण मागच्या महापालिका निवडणुकीत बऱ्याच खालच्या पातळीवर शब्दांचा वापर झाला आहे. ही नवीन सुरुवात असून कुठपर्यंत जाते पाहू, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील कुरघोडीवर आपले मत व्यक्त केले.

सामाजिक कार्यात, राजकारणात नवी पिढी उतरतेय. आज जे काही घडतंय त्याला तरुण पिढीने बळी पडता कामा नये. प्रत्येक क्षेत्रांत, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रांत तरुणांनी यावे, हा चेंज प्रत्येकाला अपेक्षित आहे. यामुळे समाजात नक्कीच बदल होईल, असे सचिन अहिर म्हणाले.

यावेळी समाजात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून नावलौकिक मिळवलेल्या तसेच विविध क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ५५ मान्यवरांना ‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

‘लोकमत’ मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट विजय शुक्ला यांच्या हस्ते या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.  राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रांत आपल्या कार्याने बदल घडवून आणणाऱ्या नागरिकांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

मराठी माणूस मुंबईबाहेर
  मुंबईत पूर्वी गिरणगाव, दादर या भागात मराठी वस्ती होती आता या भागात अभावाने मराठी माणसे दिसतात. मराठी माणूस दहिसरच्या पुढे वसई विरार, भाईंदर, डोंबिवली या ठिकाणी स्थायिक झाला आहे.
  ही चिंतेची बाब असून सरकारने स्क्वेअर फुटाला महत्त्व दिल्याने हे सारे घडले. मराठी माणूस मुंबईत टिकावा यासाठी सरकार फार काही करू शकले नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. 
  इतकेच नव्हे तर मुंबईतल्या व्यवसायात मराठी माणसाला प्राधान्य कसे मिळेल मुंबईवर मराठी माणसांची मुंबईवर पुन्हा कशी पकड येईल याचा सर्व मराठी जनतेने विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Mumbai can overtake the world political leaders expressed their confidence at the Lokmat Change Makers Award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.