Mumbai : तिकीट रद्द करणे लेखकाला पडले महागात, भामट्यांनी लावला लाखोंचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:33 PM2023-04-18T12:33:18+5:302023-04-18T12:33:47+5:30
Mumbai : रेल्वेचे तिकीट रद्द करणे एका लेखकाला महागात पडले आहे. या लेखकाचे नाव विश्वास विष्णू देशपांडे (६५) असे असून, त्यांना एनी डेस्क ॲप डाऊनलोड करायला लावत भामट्यांनी जवळपास लाखोंचा चुना लावला.
मुंबई : रेल्वेचे तिकीट रद्द करणे एका लेखकाला महागात पडले आहे. या लेखकाचे नाव विश्वास विष्णू देशपांडे (६५) असे असून, त्यांना एनी डेस्क ॲप डाऊनलोड करायला लावत भामट्यांनी जवळपास लाखोंचा चुना लावला. या प्रकरणी त्यांनी खेरवाडी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार देशपांडे हे मूळचे जळगावचे राहणारे असून, ते ३० मार्च रोजी खासगी कामानिमित्त वांद्रे येथील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घरी आले होते. काम संपवून ३१ मार्च रोजी चाळीसगावला रेल्वेने परतणार होते. त्यांनी त्याचे तिकीटही काढले होते. मात्र, ज्या कामासाठी ते आले होते, ते पूर्ण झाले नाही. तेव्हा आपल्याला जास्त दिवस राहावे लागेल, याची कल्पना आल्यावर त्यांनी बहिणीच्या पतीला रेल्वेचे तिकीट ऑनलाइन कॅन्सल करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी गुगल सर्च करून ऑनलाइन तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे कस्टमर केअर नावाने दिलेला नंबर डायल केला.
फोन उचलणाऱ्याने स्वतःचे नाव दीपक शर्मा असे सांगत तिकीट रद्द करण्यासाठी त्यांना एक लिंक पाठवत त्यात माहिती भरा, असे सांगितले. मात्र, ती लिंक मोबाइलमध्ये उघडत नसल्याने, शर्माने त्यांना मोबाइलवर कस्टमर सपोर्ट, तसेच एनी डेस्क हे ॲप डाऊनलोड करायला सांगितले. त्याने देशपांडेंकडून गुगल पे, फोन पे आणि पेटीएम से यूपीआयही विचारून घेतले. पैसे परत मिळतील, म्हणून देशपांडे यांनीही पुढील प्रक्रिया आणि व्यवहार केले, तेव्हा त्यांच्या बँक खात्यातून ५ आणि ८ हजार ९९९ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.
चुकीने डेबिट झाले
देशपांडेंनी याबाबत कॉलरला विचारणा केल्यावर, ते पैसे चुकीने डेबिट झाले असावे, असे म्हणत आज रात्री तुमचे सर्व पैसे तुमच्या खात्यात परत येतील, असे आश्वासन दिले. मात्र, त्यांना पैसे मिळालेच नाहीत, उलट १ एप्रिल रोजी त्यांच्या खात्यातून पुन्हा ४९ हजार ९९९ आणि १८ हजार ९६२ रुपये काढण्यात आले. त्यानुसार, अद्याप त्यांना सायबर भामट्यांनी ८२ हजार ९६० रुपयांचा चुना लावला असून, याची तक्रार त्यांनी सायबर पोलिसांच्या १९३० या क्रमांकावर केली आणि त्यानंतर खेरवाडी पोलिसांत दिलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला.