मुंबई : सुमारे दोन कोटी लोकांना नागरी सेवासुविधा पुरवण्याचे काम करणारी महापालिका स्वच्छतेची काळजी घेत असून, अनेक वस्त्यांमध्ये आणि उत्तुंग आधुनिक सोसायट्यांमध्ये ‘शून्य कचरा मोहीम’ यशस्वी होत आहे. त्यानुसार, १ हजार ४५० सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. या सोसायट्यांमधून दररोज ३४० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यासह ‘स्वच्छ भारत मिशन’चे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांनी सांगितले की, साधारणपणे ३० वर्षांपूर्वी ‘संत गाडगेबाबा त्रिसूत्री योजना’ राबविण्यास सुरुवात झाली. स्वच्छता, आरोग्य आणि स्वयंरोजगार या त्रिसूत्रीवर आधारित असलेली ही योजना प्रायोगिक स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आली. दत्तक वस्ती योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, ‘संपूर्ण स्वच्छता मिशन’ यांसारख्या विविध योजनांनी आणि नागरिकांच्या पाठिंब्याने दिवसागणिक मुंबईचे रुपडे देखणे होत आहे.
मुंबईची दमदार वाटचाल, शून्य कचरा मोहीम यशस्वी३० वर्षांपूर्वी अंधेरी पूर्व परिसरात ‘साईवाडी झोपडपट्टी’ या नावाने ओळख असणाऱ्या परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेचे स्वागत केले. ३० वर्षांनंतर या परिसराच्या नावातील ‘झोपडपट्टी’’ हा शब्द गायब झाला आहे. उत्तुंग टॉवर असणाऱ्या या परिसराला ‘साईवाडी’ म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आपण दरवर्षी ‘राष्ट्रीय स्वच्छता दिवस’ म्हणूनही पाळतो. कांदिवली पश्चिम परिसरातील ‘रगडा पाडा’सारख्या वस्त्या देखील ‘शून्य कचरा मोहीम’ यासारखी योजना राबवीत आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण घरांच्या किंवा कार्यालयांच्या स्तरावरच केले जाते. या वर्गीकरणातून वेगळा होणारा सुका कचरा हा पालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात ‘रिसायकल’ करण्याच्या दृष्टीने पाठविला जातो. ४६ कचरा रिसायकल केंद्र हे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यरत आहेत.सोसायटी आणि वस्त्यांव्यतिरिक्त राणीची बाग, मुंबई विद्यापीठ, कूपर रुग्णालय अशा अनेक संस्थांच्या परिसरात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प यशस्वीपणे ˘सुरू आहेत.स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत आज सुमारे १० हजार स्वयंसेवकांचे हात ८३४ संस्था विविध वस्त्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये राबत आहेत.