मुंबई - देवो के देव महादेव या मालिकेतील देवी पार्वती तसेच आदिशक्तीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिच्याविरोधात धारावीतील शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने केलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवत गुंतवणूक केल्याने फसवणूक झाल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. भदोरियाचा फोटो मॉर्फ करून वापरण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
इव्हेंट मॅनेजर असलेल्या परमेश मैत्री (२९) यांनी धारावी परिसरातील शाहूनगर पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली. आम्ही गुन्हा दाखल केला असून अभिनेत्रीच्या फोटोला मॉर्फ करत हा प्रकार झाल्याचा आम्हाला संशय आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे शाहूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितले. सोनारिक भदोरियाने तेलुगु, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रकरण काय?तक्रारदार परमेश मैत्री यांच्या म्हणण्यानुसार सोनारिकाने ३ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट अपलोड केली. त्यात इशिका जयस्वालचे सर्व स्टेटस फॉलो करा आणि पैसे कमवा असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मैत्री यांनी इशिकाला फॉलो केले. त्यावर आम्ही ट्रेडर्स असून तुमचे पैसे आम्ही गुंतवत तुम्हाला भरघोस नफा कमवून देतो असा मेसेज इशिकाने पाठवला. परमेश यांनी इशिकाच्या यूपीआय क्रमांकावर १० हजार रुपये पाठवले. पुढे इशिकाने १८ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मागितले. ते पैसे भरल्यानंतर तुमची गुंतवणूक यशस्वी झाली असून त्याबद्दल तुम्हाला ३२ हजार रुपये मिळतील. तसेच १५ मिनिटांनी तुमचा रिफंड तुम्हाला परत मिळणार असून ६४ हजार ३०० रुपये खात्यात जमा होतील असे सांगत परमेश यांच्याकडून आणखी ५२ हजार ७०० रुपये उकळले. त्यानंतर परमेश यांनी भदोरियाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्याने सोनारिका भदोरिया व इशिका जयस्वाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.