मुंबई - ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शाखेचे पाडकाम करण्याच्या कारवाईत सहभागी असलेले महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी माजी परिवहनमंत्री आणि आमदार अनिल परब यांच्यासह ठाकरे गटाच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम अशी असून, इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी सोमवारी आमदार अनिल परब यांच्यासह २५ ते ३० महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांसह सांताक्रूझ येथील एच पूर्व वॉर्ड येथे जनआक्रोश मोर्चा काढला होता. वॉर्ड अधिकारी स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासमोर या सर्वांनी पाण्याच्या समस्या आणि बेकायदा अतिक्रमणांच्या तक्रारी मांडल्या. त्यावेळी जलविभाग, इमारत, कारखाने, रस्ता सुरक्षा, मेंटेनन्स, एसडब्ल्यूएम तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुरू असतानाच शाखा पाडण्याच्या कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या पाटील यांना बोलावण्यात आले. ते आल्यावर त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पाटील यांना सर्वांसमोर धमकीही देण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
फरार हल्लेखोरांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओची मदत घेतली जाणार असल्याचे परिमंडळ आठचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.
पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शनेपालिका सहाय्यक आयुक्तांसमोर अभियंता कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी संतापलेल्या महापालिका एच पूर्व विभागात अभियंता, कामगार कर्मचारी वर्गाने बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात वज्रमूठ उगारली आहे. ठाकरे गटाच्या दोषी कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियन व म्युनिसिपल इंजिनीअर असोसिएशनने केली आहे. युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.