बत्ती बंदला मुंबईकरांचा ठेंगा!
By admin | Published: March 29, 2015 12:50 AM2015-03-29T00:50:46+5:302015-03-29T00:50:46+5:30
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले खरे; परंतू मुंबईकरांनी या बत्ती बंदला ठेंगाच दाखविला.
१पर्यावरणाची हानी टाळण्यासह कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले खरे; परंतू मुंबईकरांनी या बत्ती बंदला ठेंगाच दाखविला. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा परिसर वगळता उर्वरित मुंबईत मात्र कुठेच ‘अर्थ अवर’चा प्रभाव दिसून आला नाही.
२वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंडतर्फे २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत एक तास आयोजित ‘अर्थ अवर’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरणवाद्यांनी मुंबईकरांना केले होते. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेला असमतोल काही अंशी कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
३जगभरात सर्वत्रच ‘अर्थ अवर’ला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच मुंबईत मात्र सर्वत्रच विजेचे दिवे झळकत होते. मुळातच शनिवार आणि बँक हॉलिडे असल्याने सरकारी आणि निमसरकारी कार्यालये बंद होती. त्यात खासगी कंपन्यांची कार्यालये सुरु असली तरी आणि सर्वसामान्यांमध्ये प्रत्यक्षात ‘अर्थ अवर’बाबत फारशी जनजागृती झाली नसल्याचे चित्र होते.
४रिलायन्सच्या वीज पुरवठा क्षेत्रात १ हजार ७५० मेगावॅट वीजेची मागणी आहे. अर्थ अवरच्या निमित्ताने या क्षेत्रात वीज बंद करण्यात आल्याने ८ मेगावॅट वीजेची बचत झाली. गेल्यावर्षी हे प्रमाण १४ मेगावॅट एवढे होते.