Join us

मुंबईकरांनी साजरी केली भक्तीमय दिवाळी; ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ दीपावली महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 10:37 PM

दोन दिवसीय महोत्सवासाठी गुरूदेव श्री श्री रवीशंकर मुंबईच्या दौऱ्यावर आले होते.

मुंबई : ‘द आर्ट आॅफ लिव्हिंग’ आणि वैदिक धर्म संस्थान (महाराष्ट्र) यांच्या वतीने ‘दीपावली महोत्सव’ मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीए मैदानात २८ ते २९ आॅक्टोबर रोजी हा दीपावली महोत्सव संपन्न झाला. महोत्सवादरम्यान कुबेर पुजा, महालक्ष्मी होम आणि महासंत्सगाचे इत्यादी क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरूदेव श्री श्री रवी शंकर यांची मुख्य उपस्थिती होती. त्यांनी मुंबईकरांना संबोधित केले.

गुरूदेव श्री श्री रवीशंकर म्हणाले की, मंत्र हे मानवी शरीरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर आणतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट शब्द बोलते तेव्हा काय होते? त्यावेळी आपल्याला प्रचंड राग येतो. तेव्हा आपल्या पोटात आणि डोक्यात संवेदना जाणवू लागतात. म्हणजेच एखाद्या वाईट शब्दामुळे मानवी शरीरात तीव्र शारीरीक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. मग एखादे गोड नाव किंवा जप केल्याने शरिरात लौकिक ऊर्जेचा समावेश होतो. या ऊर्जेचा मानवी शरीराला फायदा होत नाही का?

दोन दिवसीय महोत्सवासाठी गुरूदेव श्री श्री रवीशंकर मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. गुजराती नववर्षांच्या निमित्ताने सोमवारी महालक्ष्मी होम, कुबेर पुजा आणि महासत्संग या कार्यक्रमात गुरूदेव श्री श्री रवीशंकर यांचा सहभाग होता. मंगळवारी ‘कनकधारा-शॉवर्स आॅफ विझडोम’ या विषयावर गुरूदेव यांनी मार्गदर्शन केले. मानवाच्या अंगी सकारात्मक ऊर्जा, भौतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृध्द व शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी तसेच संपत्तीची भरभराट होण्यासाठी महालक्ष्मी होमचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, कुबेर पुजा व महालक्ष्मी अष्टकाम स्त्रोताचे गायन मुंबईकरांनी एकत्र येऊन केले. याशिवाय सायंकाळी गाणी, नृत्य, ध्यान साधना आणि गुरूदेवांच्या आध्यात्मिक ज्ञानात मुंबईकर भक्तीमय वातावरणात मंत्रमुग्ध झाले होते.दोन दिवसीय समारंभात ५० हजार नागरिकांसह ५०० परदेशी नागरिकांचा दीपावली महोत्सवात जमले होते. श्री श्री रवीशंकर यांना ऐकण्यासाठी व्यावसायिक वर्ग, राजकारणी नेते, सरकारी अधिकारी व कर्मचारी, विविध प्रसारमाध्यमे तसेच अनेक संस्थांचे प्रतिनिधी हे ८० देशामधून एक लाख नागरिक आॅनलाईन दीपावली महोत्सव पाहत होते.