मुंबई : मुंबईचे आद्य शिल्पकार आणि भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकास देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी जाईल.
भारतीय रेल्वेच्या जनकांपैकी एक असलेले जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यांच्या पुढाकाराने आशियातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे यादरम्यान सुरू झाली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीमध्ये त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची मागणी वारंवार होत असते, त्यातूनच जुलै-२०१८मध्ये ‘एलफिन्स्टन रोड’चे नामकरण ‘प्रभादेवी’ असे केले होते. चर्नी रोड, ग्रँट रोड, करी रोड, दादर याही स्थानकांच्या नामबदलाची मागणी केली जात आहे.