मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्स येथील जमिनीवर होणाऱ्या थीम पार्कवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. न्यूयॉर्कमध्ये जसे सेंट्रल पार्क आहे, तसेच या ठिकाणी सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त चहल यांनी थीम पार्कविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क, लंडन येथील हाइड पार्क यांच्या धर्तीवर मुंबईतील सेंट्रल पार्क असेल. येथे मुंबईकरांना मुक्त प्रवेश असेल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रेसकोर्स व्यवस्थापनाच्या खुल्या आमसभेत सांगितल्याप्रमाणे रेसकोर्सच्या या प्रस्तावात कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाचा काहीही संबंध नाही. पावसाळ्यात रेसकोर्सची दुरवस्था होते. तेथील जागेची काळजी घेणे प्रशासनाला शक्य होत नाही. रेसकोर्सच्या जागेचा करार संपला असून, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. रेसकोर्सच्या २२६ एकरांपैकी १२० एकर जागा थीम पार्कसाठी प्रस्तावित आहे. हे संकल्पना उद्यान ते सागरी किनारा मार्गावरील उद्यानाला भूमिगत मार्गाने जोडले जाणार आहे. येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नसून केवळ मुंबईकरासाठी मोकळे उद्यान उपलब्ध करून दिले जाईल, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.
कोस्टल रोडचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्तेकोस्टल रोड प्रकल्पाचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १५ मेपासून कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
अॅक्सेस कंट्रोल ठरणार प्रभावीपूर्व आणि पश्चिम द्रुतगतीमहामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाढलेली वर्दळ आणि काही पट्ट्यांत होणारी वाहतूककोंडी पाहता महापालिकेने यावर प्रवेश नियंत्रित मार्गाचा म्हणजेच अॅक्सेस कंट्रोलचा पर्याय निवडला आहे. वाहतूक झटपट व सुरळीत होण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दुतगती महामार्गावरील जंक्शनवर उड्डाणपूल, अंडरपास सुविधा उपलब्ध होणार आहे. आठ ठिकाणी हा प्रकल्प राबविला जाईल.
सौंदर्यीकरणामधील १,१९२ कामे पूर्ण
मुंबई सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पालिकेकडून हाती घेण्यात आला असून, त्यामध्ये १३०० हून अधिक कामे प्रस्तावित आहेत. यामधील ११९२ कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून यासाठी ७६६ कोटींचा खर्च झाला आहे. १११ कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती चहल यांनी दिली.