Mumbai Local Train Update मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने लोकलच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:41 AM2024-07-24T08:41:26+5:302024-07-24T11:11:23+5:30
Mumbai Local Train Update मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Mumbai Local : मुंबईतमध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. माटुंगा स्थानकाजवळ फास्ट ट्रॅकवरील लोकल वाहतूक खोळंबली आहे. माटुंगा स्थानकाजवळील फास्ट ट्रॅकवर बांबू कोसळल्याने लोकल थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे वाहतूक थांबली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या घटनेचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅकवरील बांबू बाजूला करुन लोकल वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.
माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या लोकल १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळल्याने अप जलद मार्गावर सुमारे ३५ मिनिटे लोकल ट्रेन अडकून पडली होती. यानंतर काही गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या ज्यामुळे सर्व लोकल गाड्यांना जवळपास १५ मिनिटे उशीर झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
माटुंगा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे हद्दीलगतच्या एका इमारतीची बांबू शेड रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. सकाळच्या वेळेसच ही घटना घडल्याने कामावर जाणाऱ्यांना मोठा फटका बसला. बराच वेळ फास्ट लोकल एकाच ठिकाणी थांबल्यामुळे शेकडो प्रवासी खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरुन चालत स्टेशन गाठत आहेत. या घटनेमुळे घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पर्यन्त जलद लोकलच्या प्रवाशांना फटका बसला आहे. सर्व जलद लोकल विलंबाने धावत असून ठाणे माटुंगा मार्गावर काही लोकल उभ्या असून प्रवाशांची त्यात खचाखच गर्दी असल्याने गाड्या सोडाव्यात यासाठी ते ताटकळले आहेत.
रेनकोटमुळे २५ मिनिटे खोळंबली लोकल
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात एका रेनकोटमुळे लोकल सेवा २५ मिनिटे ठप्प होती. सोमवारी दुपारी 3 नंतर एका मुलाच्या लहानशा चुकीमुळे पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ थांबली होती. चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर हा मुलगा उभा होता. तिथल्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर त्याची मैत्रीण उभी होती. दरम्यान, तिला पावसापासून वाचवण्यासाठी त्याला मैत्रिणीला रेनकोट द्यायचा होता. पण त्याने रेनकोट इतक्या वेगाने आणि उंच फेकला की तो ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यानंतर स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. कारण त्या ट्रॅकवर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ओव्हरहेड वायरवरून तो रेनकोट खाली आणला. त्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली. या निष्काळजीपणाबद्दल आरपीएफने मुलाला ताब्यात घेतलं होतं.