मुंबई : दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पसंतीच्या क्रमांकामुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडते. पसंतीच्या क्रमांकातून २०१६-१७ कालावधीत सरकारला ३.३७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. परिणामी, सध्या सुरू असलेली चारचाकी वाहन क्रमांक मालिका संपुष्टात येणार आहे. नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे. यामुळे ग्राहकांनी आपल्या पसंतीचा क्रमांक आरक्षित करण्याचे आवाहन, मुंबई मध्यचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.आकर्षक आणि पसंतीच्या क्रमांकासाठी आरटीओ कार्यालयात ग्राहकांची गर्दी होते. ठरावीक रक्कमभरून, विशिष्ट क्रमांक आपल्या नावे करण्यात येतो. यासाठी लाखो रुपये मोजण्यास ग्राहक तयार असतात. गतवर्षी आकर्षक आणि पसंतीच्या क्रमांकामधून सरकारला तब्बल ३ कोटी ३७ लाख ९९ हजार २८६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.सध्या सुरू असलेली ‘एमएच-०१-सीपी’ ही मालिका लवकरच संपुष्टात येणार आहे. ‘एमएच-०१-सीटी’ ही नवीन क्रमांकाची मालिका सुरू होणार आहे. परिणामी, नवीन मालिकेतील कोणताही क्रमांक ठरावीक शुल्क भरून आरक्षित करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित चालकांचे फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती असणे आवश्यक आहे. आरक्षित केलेल्या चारचाकी वाहन क्रमांकाची वैधता ३० दिवस असेल. ३० दिवसांच्या आत सदर क्रमांकावर वाहन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या प्रक्रियेसाठी आरटीओ कार्यालयात ई-१९ वर अर्ज उपलब्ध आहे. या खिडकीवर ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाºयांचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई मध्य आरटीओ, पसंतीच्या वाहन क्रमांकाद्वारे ३.३७ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 3:47 AM