लोकमत नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या अशा मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरशेठ टर्मिनस असे नामांतर केले जाणार आहे. नामांतराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणा केली असता, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सकारात्मक उत्तर दिले असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.
सहा वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी राज्य आणि केंद्राला पत्र लिहून या नामांतराची मागणी केली होती. या मागणीला राज्यातील कॅबिनेटने मार्च महिन्यात मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्राच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यास आधीच फार विलंब झाला आहे. याबाबत राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारकडून विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल व नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, अशी आशा आहे, असे सावंत म्हणाले.