इतर राज्यांतून येणाऱ्या परदेशी प्रवाशांचे मुंबईपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:05+5:302021-01-08T04:16:05+5:30
मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रसार टाळण्यासाठी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात ...
मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रसार टाळण्यासाठी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र सात दिवसांचे क्वारंटाइन टाळण्यासाठी इतर राज्यांतील विमानतळावर उतरून महाराष्ट्र, मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे परदेशी प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्या-त्या विमानतळावर क्वारंटाइन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले जात आहे. यासाठी २१ डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. यापैकी महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत असून अन्य प्रवासी मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहेत. तर हॉटेलमध्ये सात दिवस राहणे परवडत नसलेल्या प्रवाशांच्या मागणीनुसार महापालिकेने भायखळा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये त्यांची विनामूल्य व्यवस्था केली आहे.
मुंबई, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी गेले अनेक महिने प्रचंड मेहनत घेण्यात आली. २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात आलेल्या प्रवाशांचाही शोध सुरू आहे. यापैकी मुंबईत पाच रुग्णांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. परंतु, इतर राज्यांतील विमानतळावर उतरून देशांतर्गत प्रवास करीत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा शोध घेणे शक्य नाही. यामुळे मुंबई, महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी अन्य राज्यांतील क्वारंटाइनचे नियम कडक असावे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
........
संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यांत व देशाबाहेर प्रवास केलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे. यात केवळ राज्य शासनाने मुंबईत विलगीकरण न करता अन्य राज्यांतील यंत्रणांनीही खबरदारी बाळगून त्या त्या राज्यात विलगीकरण कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. संसर्ग नियंत्रणाच्या प्रक्रियेत अलगीकरण व विलगीकरणाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. शशांक जोशी (सदस्य, राज्य कोविड १९ टास्क फोर्स)