नऊ महिन्यांनंतर मोनो रेलचा पुनर्जन्म; वडाळा-चेंबूर प्रवास होणार सोपा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:39 PM2018-08-27T13:39:18+5:302018-08-27T13:47:07+5:30
9 महिन्यांपूर्वी आग लागल्याच्या कारणामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली होती.
मुंबई - मुंबईतील मोनो रेलची सेवा 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. 9 महिन्यांपूर्वी आग लागल्याच्या कारणामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता चेंबूर ते वडाळा स्थानकापर्यंत मोनो रेलची सेवा प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोनो रेलची सेवा सुरू करण्यात येणार आहे की नाही?, याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून 1 सप्टेंबरपासून मोनो रेल पुन्हा धावणार आहे.
एमएमआरडीएनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोनो रेलची चाचणी सुरू आहे. दरम्यान, सरकारला मोनो रेलमधून 5 ते 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. चेंबूरपासून ते वडाळापर्यंत मोनो रेलची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र वडाळा ते जेकब सर्कलपर्यंत मोनो रेल सुरू करण्यात अपयश आलेले आहे. कारण काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा सुरू करण्यास काही कालावधी जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.