- मनोहर कुंभेजकर
मुंबई - आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई महानगरातील नागरी समस्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेताना नालेसफाई, विविध विकासकामांची सद्यस्थिती, वाहतूक कोंडीची समस्या, रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण कामांची सद्यस्थिती, नगरसेवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या यांच्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. शिवसेना-शिंदे गटाच्या प्रवक्त्या व उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी लोकमतला ही माहिती दिली.
यावेळी नगरसेवकांकडून हे प्रश्न स्वतः जातीने समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. तसेच निर्देश दिल्याप्रमाणे कामे करून घ्यावीत तसेच त्यांची प्रगती माझ्यापर्यंत पोहचवावी असेही मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नगरसेवकांना सांगितले.
यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, उपनेते-विभागप्रमुख यशवंत जाधव, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.