Join us

Mumbai: बोरिवलीच्या साईबाबा नगर येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By मनोहर कुंभेजकर | Published: April 13, 2023 6:32 PM

Mumbai News: बोरिवली पश्चिम साईबाबा नगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधते गेल्या 15 दिवसांपासून गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळले आहे.

- मनोहर कुंभेजकर मुंबई - बोरिवली पश्चिम साईबाबा नगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधते गेल्या 15 दिवसांपासून गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळले आहे.त्यामुळे येथे राहणाऱ्या हजारो नागरिकांना या दूषित पाणी पुरवठ्याचा फटका बसला आहे. येथील अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले असून त्यांना टायफॉइड आणि गेस्ट्रोचा त्रास होत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. तर प्रकरणी पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आज बाज विजय अपार्टमेंटचे संतप्त नागरिक व महिला सोसायटीत एकत्र जमल्या. आणि येथील नागरिकांच्या या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेविका बिना दोशी यांच्या विरोधात त्यांनी घोषणा बाजी केली.

येथील बाज विजय अपार्टमेंट, जी बी ऍप्ट, एलटी अपार्टमेंट, एम्बी अपार्टमेंट, रिद्धी अपार्टमेंट, एसटी अपार्टमेंट, रिद्धी ऍप्ट, एस्के अपार्टमेंट,सिद्धी टॉवर आणि परिसरातील इतर गृहनिर्माण सोसायटीच्या नागरिकांना टिफॉइड आणि गेस्ट्रोचा त्रास होत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. या प्रकरणी येथील अध्यक्ष व सचिवांनी आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.आणि लवकर या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली.

येथील बाज विजय अपार्टमेंटचे अध्यक्ष व सचिवांनी सांगितले की,येथील दूषित पाणी पुरवठ्याबद्धल आर मध्य वॉर्डच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सुद्धा सदर समस्या अजून सुटलेली नाही.येथील पाण्याला उग्र घाण वास येतो.आणि पाणी प्यायल्याने येथील अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे.रोज बिल्सलरीचे कॅन विकत घ्यावे लागत आहेत. जर पालिका प्रशासनाने सदर समस्या लवकर सोडवली नाही तर येथील नागरिक आर मध्य विभाग कार्यालय व माजी नगरसेविका बिना दोशी यांच्या घरावर मोर्चा काढतील.

याबाबत आर मध्य विभागाच्या पाणी खात्याच्या साहाय्यक अभियंता आरसी मांडावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,अजून तरी आपल्याकडे याबाबत तक्रार आली नाही.मात्र सोसायटीने पत्ता दिल्यावर आमच्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्पॉट वर जावून पाहाणी करतील आणि सदर समस्या सोडवतील.

टॅग्स :मुंबईपाणी