मुंबई ठरतेय अपघातांचे शहर; अपघातांमुळे ९८७ मुंबईकरांचा बळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:36 AM2018-08-23T04:36:31+5:302018-08-23T06:44:58+5:30
पाच वर्षांत ४९,१७९ अपघात; माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव उघड
मुंबई : मुंबईत गेल्या पाच वर्षांत तब्बल ४९ हजार १७९ आपत्कालीन दुर्घटनांमध्ये ९८७ मुंबईकरांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनांमध्ये एकूण ३ हजार ६६ मुंबईकर जखमी झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे? याचा अंदाज बांधता येतो.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २०१३ ते २०१८ सालादरम्यान मुंबईत झालेल्या अपघातांच्या घटना आणि त्यांत मृत पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांची आकडेवारी मनपाकडे मागितली होती. त्यानुसार महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी तथा सहायक अभियंता सुनील जाधव यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यात २०१३ सालापासून जुलै २०१८ दरम्यान झालेल्या एकूण ४९ हजार १७९ आपत्कालीन दुर्घटनांत ९८७ लोकांचा मृत्यू आणि तर ३ हजार ०६६ लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे.
२०१३ साली झालेल्या अपघातांत एकूण १४९ पुरुष, तर ६६ स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला. तसेच ४३६ पुरुष, तर २०० महिला जखमी झाल्याची नोंद आहे. त्यानंतर २०१४ साली तितक्याच अपघातांची नोंद झाली असली, तरी सुदैवाने मृत आणि जखमी नागरिकांच्या आकड्यांत कमालीची घट झाली होती. या वर्षी १२० पुरुष आणि २० महिलांचा मृतांमध्ये समावेश होता. तर ३३१ पुरुष आणि १५९ स्त्रिया जखमी झाल्या होत्या. २०१५ सालीही अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते. त्या वर्षी ११० पुरुष आणि ३७ स्त्रियांना जीव गमवावा लागला होता. मात्र त्या तुलनेत ३०७ पुरुष आणि १८७ स्त्रिया जखमी झाल्याची नोंद आहे. २०१६ साली अपघातांत कमालीची वाढ झाल्याने मृतांचा आणि जखमींचा आकडाही वाढला.
२०१७ साली सर्वाधिक अपघात
२०१३ सालापासून सर्वाधिक अपघाताची नोंद २०१७ साली नोंदविण्यात आली आहे. या वर्षी एकूण ११ हजार ५२४ अपघात झाले असून त्यात २२६ मुंबईकरांचा हकनाक जीव गेला, तर ५२६ मुंबईकर जखमी झाल्याचे समजते. मृतांमध्ये १०५ पुरुष, तर १२१ महिलांचा समावेश आहे. तसेच जखमींमध्ये ३५९ पुरुष आणि १६७ महिलांची नोंद आहे.
या अपघातांचा समावेश
आपत्कालीन दुर्घटनांत झाडे व झाडांच्या फांद्या पडणे, दरड कोसळणे, घर किंवा घरांचे भाग कोसळणे, इमारती कोसळणे, आग, रस्त्यावरील तेलगळती, समुद्रात किंवा नाल्यात किंवा नदीत किंवा विहिरीत किंवा खाडीत पडणे, मॅनहोलमध्ये पडणे, अपघातांचा समावेश आहे.
झाडे कोसळून ३० लोकांचा मृत्यू
/>२०१३ पासून जुलै २०१८ सालादरम्यान झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या एकूण २१ हजार ४५२ घटना घडल्या. त्यात ३० लोकांचा मृत्यू, तर २५६ लोक जखमी झाले.
३२८ लोकांना जलसमाधी
समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानीत आणि मॅनहोलमध्ये पडून ३२८ मुंबईकरांचा हकनाक जीव गेल्याची माहितीही या वेळी समोर आली आहे. त्यात २३७ पुरुष, तर ९१ महिलांचा समावेश आहे. याशिवाय या घटनांमध्ये १६७ मुंबईकर जखमी झाले आहेत.
२०८ मुंबईकरांचा होरपळून मृत्यू
मुंबईत पाच वर्षांत आगीच्या २० हजार ०७४ घटनांची नोंद असून त्यात २०८ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय १ हजार ०७७ मुंबईकर जखमी झाले आहेत.
दरवर्षी अपघातांची शंभरी
गेल्या पाच वर्षांत मुंबईतील नुसत्या अपघातांची आकडेवारी पाहिल्यास दरवर्षी सरासरी १०० अपघातांची नोंद दिसते. त्यात एकूण ६६ लोकांचा मृत्यू, तर २९१ जखमींची माहिती आहे.
दरडीमुळे ७ जण दगावले
याच कालावधीत मुंबईत ७१ वेळा दरड कोसळून ७ लोकांचा मृत्यू झाला असून १४ लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
तेलगळतीमुळे २२ मृत्यू
मुंबईत १ हजार ११९ तेलगळतीच्या घटनांमुळे २२ जणांचा मृत्यू, तर २९२ लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
गॅसगळतीनेही मृत्यू
मुंबईत पाच वर्षांत गॅसगळतीच्या १ हजार २९१ घटना नोंदविल्या असून त्यामुळे ७ लोकांचा मृत्यू, तर ७१ लोक जखमी झाल्याची नोंद आहे.
घर, इमारत कोसळून २३४ नागरिकांचा मृत्यू
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांत मुंबईत घर, घराचा भाग, भिंती, इमारत आणि इमारत कोसळल्याच्या २ हजार ७०४ घटना घडल्या. त्यात एकूण २३४ मुंबईकरांना जीव गमवावा लागला असून ८४० लोक जखमी झाल्याची नोंद आहे.
प्रत्येक महिन्याला हजार अपघात
२०१८ सालातील पहिल्या सात महिन्यांतच मुंबईत ६ हजार ७३० अपघात नोंदविण्यात आले आहेत. यानुसार मुंबईत दर महिन्याला सरासरी एक हजार अपघात होत असल्याचे समजते. या वर्षी ९६ मुंबईकरांना या अपघातांत जीव गमवावा लागला असून ३७९ मुंबईकर जखमी झाल्याची माहिती आहे.