अलर्ट! मुंबईकरांनो सावधान, पुढील ३ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:21 PM2022-07-05T15:21:16+5:302022-07-05T15:22:01+5:30
राज्यात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगर पट्ट्यातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.
राज्यात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगर पट्ट्यातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यातच पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.
VIDEO: मध्य रेल्वेच्या सायन ते माटुंगा रेल्वे ट्रॅकवर साचलं पावसाचं पाणी pic.twitter.com/Q0HkhHA2lH
— Lokmat (@lokmat) July 5, 2022
मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून सखल भागांत पाणी साचलं आहे. यात सायन येथील गांधी मार्केट, प्रभादेवी येथील सखल भाग आणि हिंदमाता येथे पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. तसंच पश्चिम द्रूतगती महामार्गावरही वाहतूक खोळंबली आहे. यातच पुढील चार तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल सेवेला देखील पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे. पण पावसाचा जोर असाच कायम राहीला तर रेल्वेसेवा विस्कळीत होऊन ठप्प पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसंच हार्बर मार्गावरही मानखुर्द-गोवंडी येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.
VIDEO: मानखुर्द-गोवंडी हार्बर लाइनवर साचलं पावसाचं पाणी, वाहतूक विस्कळीत pic.twitter.com/qXmtu8yxNn
— Lokmat (@lokmat) July 5, 2022
सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे बेस्ट बसच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. सायन रोड क्रमांक २४ वरील बस क्रमांक ३४१,४११,२२,२५,३१२ सायन रोड क्रमांक ३ मार्गे वळविण्यात आली आहे. तर नर्मदेश्वर मंदिर मंडला बस क्रमांक सी२१, ३५२, ३५५, ३६०, ३९९ मंडलापर्यंत धावणार आहे. बस क्र ४,३३,२४१,८४ यांचे मार्ग नॅशनल कॉलेज येथून लिंकिंग रोडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. बस क्र ३११,३२२,३३०,५१७ यांचे मार्ग एअर इंडिया कॉलनी येथून एससीएलआर उड्डाणपूलमार्गे सुरू आहेत.
मुंबई लोकलची सद्यस्थिती-
- हार्बर रेल्वे मार्गावर गोवंडी-मानखुर्द दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक प्रचंड मंदावली आहे.
- मध्य रेल्वे मार्गावर सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटांनी उशीरानं सुरू आहे.
- पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक देखील १० मिनिटं उशीरानं सुरू आहे.