Join us

Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची सत्तरी; आजही धोका कायम, मुंबई अन् कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:09 AM

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात कुलाबा येथे ९७ तर सांताक्रूझ येथे ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या चोवीस तासात सरासरी ७० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून गुरुवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगर पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. उपनगर वाऱ्यासह पावसाच्या मोठ्या सरी कोसळत असून गुरूवारी दिवसभर मुंबई बहुतांश ठिकाणी मुसळधार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग आणि मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिवसभर मुंबईत ताशी ४६ ते ६० किलोमीटर ठिकाणी वारे वाहतील. आणि याच काळात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात कुलाबा येथे ९७ तर सांताक्रूझ येथे ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी सकाळपासून मुंबई ठिकाणी विश्रांती घेत का होईना पावसाची मुसळधार सुरू आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कायम असलेला पाऊस पुढील बहात्तर तास जास्त वेगाने कोसळणार आहे.

मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट असून, ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धिंगाणा सुरुच असून, गुरुवारीदेखील या दोन विभागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांना तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे अधिकारी जयंता सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल आहे. मध्य महाराष्ट्राला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईला गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस समुद्र किनारी सोसाटयाचा वारा वाहील. या काळात मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात देखील रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २२ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

पाऊस मिमीमुंबई शहर ७४पश्चिम उपनगर ६०पूर्व उपनगर ७१

पाऊस मिमीमहालक्ष्मी १४४मानपाडा १३०मुंब्रा १४५कासारवडवली १२७राम मंदिर ९८विक्रोळी ८७

टॅग्स :पाऊसमुंबईमुंबई महानगरपालिका