Join us

मुंबई शहरातील जमिनीची मिळकत पत्रिका मोबाइल ॲपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशील जमीनधारकांना ...

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशील जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाइल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले आहे. या ॲपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी लोकार्पण केले.

या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी केले.

या ॲपची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या mumbaicity.gov.in व prcmumbai.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने ई-प्रॉपर्टी कार्ड या ॲपची निर्मिती केली असून जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे ॲप विकसित केले आहे.