मुंबई : मुंबई हे भारतातील मुख्य व्यापार केंद्र असून मुंबई शहराची जागतिक स्तरावर प्रतिमा उंचावण्यासाठी राज्यशासन व मुंबई शहर यातील दुवा म्हणून नक्कीच काम करायला आवडेल व प्रयत्न सुद्धा करेल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले.
"इंडिया सिम्पोझियम २०२०" अंतर्गत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये "व्यावसायिक संधी" या विषयावर आज दि.१० डिसेंबर २०२० रोजी आयोजित आँनलाईन वेबिनारमध्ये युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना महापौर बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून "आयसीऐआय" नेदरलँडचे अध्यक्ष श्री. विकास चतुर्वेदी, ओयो हाँटेल्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. रितेश अग्रवाल, युरोपियन युनियनचे भारतातील वाणिज्य दूत श्री उगो अँसटयूटो, बेल्जियमचे राजदूत श्री संतोष झा, "एलटी फूड युरोप" चे श्री.विकास मँगन सहभागी झाले होते.
महापौर किशोरी पेडणेकर संबोधित करताना पुढे म्हणाल्या की, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून २०१८ साली महाराष्ट्र शासनाने "फिनटेक" धोरणांतर्गत मुंबईमध्ये व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी "फिनटेक इकोसिस्टीम" निर्माण केलेली आहे. या प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. त्यामुळे मुंबईला "ग्लोबल फिनटेक हब" बनविण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असून ज्यांच्यामध्ये वेगवेगळे उद्योग,बाजार,भांडवलाची सहजपणे उपलब्धता यासारख्या गोष्टींमुळे "मुंबई फिनटेक हब" हे एक उत्तम उदाहरण जागतिक पातळीवर ठरू शकेल, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.
याठिकाणी वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून तुम्ही यामध्ये सहभागी व्हावे, व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपण जे श्रम करीत आहात ते श्रम वाया जाणार नाही, असा मला विश्वास असून यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असून महापौर म्हणून आपल्याला आश्वासित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. "मुंबई फिनटेक हबच्या" माध्यमातून चारशेहून अधिक कंपन्या कार्यरत असून याचा विस्तार विदेशातील कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी प्रतिपादन केले.