मुंबई : रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यात थुंकणारे, घाण करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची सर्वप्रथम लोकमान्य टिळक टर्मिनसवर नियुक्ती होणार आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. विशेष भारतीय रेल्वे अधिनियामांतर्गत अधिकृत दंड आकारला जाईल. क्लीनअप मार्शलला केवळ कारवाईसाठी नाहीतर स्वच्छतेबाबत जनजागृती आणि रेल्वे प्रवाशांना मदत करण्याचेही प्रशिक्षण देणार आहोत. यासाठी मध्य रेल्वे एका खासगी कंपनीला कंत्राट देणार आहे.
या कारणांमुळे मार्शलचे थांबवले काममुंबई महानगरपालिका प्रशासनाने काही वर्षांपासून मुंबईतील रस्त्यांवर थुंकणारे, घाण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र, क्लीनअप मार्शलनी वसुलीचा धंदा सुरू केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याशिवाय नागरिक आणि क्लीनअप मार्शलच्या मारामारीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने क्लीनअप मार्शल बंद करण्याचा निर्णय घेतला.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे घेतला निर्णय स्थानकांवर किंवा धावत्या गाडीत थुंकणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या प्रवाशांविरोधात अनेकदा रेल्वेकडून कारवाई करण्यात येते. याशिवाय रेल्वे गाड्यात आणि रेल्वे परिसरात थुंकू नका, अशा उद्घोषणा वारंवार देण्यात येत असतात. थुकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. म्हणून क्लीनअप मार्शलचा पर्याय निवडला.