धूळ, धुके आणि धूरके...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:41 AM2018-10-25T03:41:04+5:302018-10-25T03:41:08+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील धूळ आणि धुक्याच्या मिश्रणामुळे तयार होणारे धूरके मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील धूळ आणि धुक्याच्या मिश्रणामुळे तयार होणारे धूरके मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे पावसाळा संपल्यानंतर मुंबई आणि शहर आणि उपनगरावरील धूरक्यामध्ये वाढच नोंदविण्यात येत असून, संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात मुंबई धूरक्यातच हरविल्याचे चित्र आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात आली असून, बदलते वातावरण अधिकच ‘ताप’दायक ठरत आहे.
आॅक्टोबर महिना सुरू झाल्यापासूनच मुंबईवर धूरक्याची चादर पसरली आहे. माझगाव, वरळी, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, बोरीवली आणि चेंबूर परिसरातील धूरक्याचे प्रमाण अधिकाधिक नोंदविण्यात येत आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल आणि वरळी या दोन परिसरांत धूरक्याचे प्रमाण सातत्याने जास्त नोंदविण्यात येत असून, यास बदलते वातावरण आणि शहराची बदलत असलेली रचना कारणीभूत असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे धूरक्यात वाढ नोंदविण्यात येत असल्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जोवर हवा पूर्णत: वाहती अथवा खेळती राहत नाही; तोवर हे प्रमाण असेच राहील, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे असून, दिवसागणिक धूरक्याचे प्रमाण वाढतच जाणार आहे.
>वांद्रे-कुर्ला संकुलात हवेची गुणवता घसरली
अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेची गुणवत्ता घसरली आहे. हवेतील प्रदूषण वाढले आहे. आॅक्टोबर महिन्यात अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेची गुणवत्ता घसरल्याची नोंद करण्यात आली होती. हिवाळ्यात मुंबईमधील धूलिकणांचे प्रमाण असेच राहणार आहे. दरम्यान, मानवासह पशुपक्ष्यांना हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. उंच इमारतीमुळे खेळते वातावरण राहत नाही. त्यामुळे धूलिकण एकाच ठिकाणी कोंडले जातात. मुंबईत झाडांची संख्या कमी होत असल्याने धूलिकणांना स्थिरावण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे धूलिकण हवेत स्थिरावत आहेत.
बुधवारी नोंद करण्यात आलेली हवेची गुणवत्ता, निर्देशांक (वातावरणातील कणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये, स्रोत : सफर)
वांद्रे-कुर्ला संकुल ३१३
अंधेरी ३१०
वरळी ८६
कुलाबा १३२
चेंबूर ७४
माझगाव १८६
बोरीवली १०७
भांडुप ८४
मालाड ९४
नवी मुंंबई २५०