Join us

वातावरण बदलाने मुंबई ढगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 6:19 AM

राज्यात ठिकठिकाणी गारा आणि अवकाळी पाऊस सुरू असतानाच, मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरणातही बदल नोंदविण्यात येत आहेत.

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी गारा आणि अवकाळी पाऊस सुरू असतानाच, मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरणातही बदल नोंदविण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून वातावरणा बदल होत असून, रात्रीच्या सुमारास मालाडसह वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ परिसरात पावसाची तुरळक हजेरी लागली आहे. मंगळवारी सकाळी आणि दुपारी मुंबई शहरासह उपनगरावर मळभ दाटून आले होते. परिणामी, ऊन आणि सावली असा लपंडाव सुरू असतानाच उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले होते.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. बुधवार, १७ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १८ ते २० एप्रिलदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.दरम्यान, कुठे, केव्हा आणि किती पाऊस पडतो, याची नोंद ठेवण्याचे काम हवामान खाते करते. यासाठी केवळ आणि केवळ वेधशाळांतील उपकरणांचा आधार घेतला जातो. मात्र, १६ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता पुण्याच्या भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दैनंदिन हवामान वृत्तामधील ठळक घडामोडींमध्ये चक्क ‘वर्तमानपत्रानुसार काल सध्यांकाळी पुणे शहराच्या काही भागांत गारांचा पाऊस पडला,’ अशी नोंद करण्यात आली आहे.>कमाल तापमान राहणार ३४ अंशमुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश १७ आणि १८ एप्रिल रोजी मुख्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला.शहरांचे मंगळवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मुंबई ३३.५, नाशिक ३८, मालेगाव ४०, जळगाव ३९.४, पुणे ३९, बारामती ३९.५, सातारा ३८.६, सांगली ३९.५, सोलापूर ४२.१, जेऊर ४०, कोल्हापूर ३८.३, औरंगाबाद ३८.३, जालना ४१.५, उस्मानाबाद ४१.१, बीड ४१.७, नांदेड ४३, परभणी ४१.६, उदगीर ४१.२, अकोला ३९.७, अमरावती ४१.२, बुलडाणा ३८, चंद्रपूर ४४.८, गोंदिया ४०.८, नागपूर ४२, वाशिम ४०, यवतमाळ ४१.