Join us

मुंबई ढगाळ, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:24 AM

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ...

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून, मुंबई आणखी दोन दिवस ढगाळ नोंदविण्यात येईल. तर उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपीट होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे बुधवारी मुंबई किंचित ढगाळ होती. गुरुवारी यात आणखी भर पडली. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही चढउतार नोंदविण्यात येत असून, गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. विशेषत: मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात आली असून, बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली.

दुसरीकडे राज्याच्या वातावरणातही उल्लेखनीय बदल होत असून, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आला असतानाच ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि पालघर येथील कमाल तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

* कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक

मुंबईत बुधवारी नोंदविण्यात आलेले ३६ अंश सेल्सिअस हे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी अधिक होते. परिणामी कधी थंडी तर कधी उबदार असे वातावरणात बदल होत असून, हाच कित्ता आणखी दोन दिवस गिरवला जाणार आहे.