लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शनिवारी अर्धा दिवस मुंबई अंशत: ढगाळ नोंदविण्यात आली. सकाळी १० पर्यंत आणि दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई शहरासह उपनगरात बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर मुंबईकरांना मात्र ऊन्हाचे चटके बसू लागले. दुपारपासून पडलेले ऊन ४ वाजेपर्यंत नागरिकांना पोळत असतानाच हवामान होत असलेल्या बदलामुळे उकाड्यानेही घामाघूम केले होते. सायंकाळसह रात्री उकाड्यात वाढ झाल्याचे चित्र होते.
पुढील २४ तास मुंबईत किंचित ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दुसरीकडे राज्याच्या हवामानातदेखील उल्लेखनीय बदल झाले आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून, २ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.