- मनोहर कुंभेजकरमुंबई - कांदिवली पूर्व,समता नगर येथे पश्चिम दुर्तगती महामार्गावर पादचारी(स्कायवॉक) पूलाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यामुळे येथील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व उत्तर मुंबईचे संपर्कप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी ही माहिती दिली.
बोरिवली पूर्व पश्चिम दुर्तगती महामार्गावर नॅशनल पार्क लगत श्रीकृष्ण नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पूलाचे उद्या शनिवार दि,११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने अखेर येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहिर सभा सायंकाळी ७ वाजता दहिसर पूर्व,अशोकवन येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील बोरिवली पूर्व नॅशनल पार्क लगत असलेल्या प्रभाग क्र.११ मधील श्रीकृष्ण नदीवरील पूल धोकादायक झाल्याने सदर पूल पाडून येथे मुंबई महानगर पालिकेतर्फे नवीन पूल बांधण्याचे काम गेली दीड वर्षे सुरू होते. मात्र सदर पूल बंद असल्याने वाहनांना व नागरिकांना गोकुळ आनंद हॉटेल मार्गे,श्रीकृष्ण नगर,नॅन्सी कॉलनी आणि परिसरात यावे लागते.सदर पूलाच्या कामांमूळे नागरीकांना याचा दळवळणसाठी त्रास होता तसेच वाहतूक कोंडीमूळे वेळ वाया जातो अश्या येथील नागरिकांच्या तक्रारी होत्या.याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कडे आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.श्रीकृष्ण नगर नदी परिसर पावसाळ्यात जलमय होतो आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे येथे श्रीकृष्ण नगर ते बोरिवली स्थानक हा नियोजित स्काय वॉक रद्द करून येथे श्रीकृष्ण नदीवर नव्याने पूल बांधण्यासाठी स्काय वॉकचा निधी वळवण्यासाठी पाठपुरावा केला.त्यामुळे अखेर श्रीकृष्ण नदीवर नव्याने सुसज्ज पूल बांधण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.