कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 08:36 AM2024-06-01T08:36:54+5:302024-06-01T08:37:28+5:30

बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या २५ जॉइंट्सची पाहणी करून आवश्यकता असल्यास दुरुस्ती केली जाणार आहे

Mumbai Coastal Road is Safe as Success in Stopping Water Seeping in Tunnel says Mumbai Municipal Corporation BMC | कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बोगद्यात पाणीगळती झाल्यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बोगद्यातील एक्स्पान्शन जॉइंटमधून झिरपणारे हे पाणी रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. स्वत: आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी बोगद्यातील या कामांची पाहणी केली. त्यांनी सर्व दुरुस्तीच्या कामांची खात्री करून घेतली असून, कोस्टल रोड वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याने मुंबईकरांनी कोणतीही काळजी करू नये, अशी ग्वाही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

२७ मे रोजी कोस्टल रोडच्या बोगद्यातील एक्स्पान्शन जॉइंटमधून पाणी झिरपू लागल्याने बोगद्यात ओलावा निर्माण झाला. या प्रकारामुळे मुंबईकरांमध्ये घबराट निर्माण झाली. दोन महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच अशी गळती लागली तर पावसात काय दुर्दशा होईल, प्रकल्पावर खर्च केलेले १४ कोटी वाया गेले, अशी टीका होऊ लागली. या सगळ्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: बोगद्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शिवाय त्याच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत खात्री देऊन अधिकाऱ्यांना लागलीच यावर कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कोस्टलच्या भूमिगत बोगद्यात केलेल्या उपाययोजनांची पाहणी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त चक्रधर कांडळकर आदी उपस्थित होते.

२५ जॉइंट्सची पाहणी आणि दुरुस्ती

या पार्श्वभूमीवर टनेल एक्सपर्ट आणि एल अँड टीचे तज्ज्ञ यांच्या साहाय्याने ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. बोगद्यात भिंतींच्या बाजूला गळणारे पाणी हे भिंतीला तडे गेले नाहीत. त्यामुळे २ ते ३ ठिकाणी त्यावर इपॉक्सी ग्राऊंटिंग इंजेक्शनचा वापर करण्यात आला आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या २५ जॉइंट्सची पाहणी करून आवश्यकता असल्यास दुरुस्ती केली जाणार आहे.

आम्ही सर्व ठिकाणच्या जॉइंट्सची पाहणी करून त्यावर कायम दुरुस्तीचा प्रयत्न करीत आहोत ज्यामुळे मुंबईकरांना यापुढे त्रास होणार नाही. मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नसून कोस्टल रोड पूर्णपणे सुरक्षित आहे.
- अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त

Web Title: Mumbai Coastal Road is Safe as Success in Stopping Water Seeping in Tunnel says Mumbai Municipal Corporation BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.