कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 05:04 PM2024-05-28T17:04:30+5:302024-05-28T17:05:42+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी एका रात्रीत संबंधित जागेवर डागडुजी करुन गळती थांबवली आहे.
मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. या घटनेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी एका रात्रीत संबंधित जागेवर डागडुजी करुन गळती थांबवली आहे.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा ११ मार्च रोजी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरिन ड्राइव्ह या ११ किमीच्या पट्ट्यात २.०७ किमी लांबीचा टनेलही सेवेत आल्यामुळे प्रवासही सुसाट होत आहे. पण याच टनेलमध्ये पाणी गळती होत असल्याचा व्हिडिओ कालपासून व्हायरल झाला. यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत माहिती घेतली. तसंच मनपा अधिकारी आणि एलएनटीच्या अधिकाऱ्यांनी गळतीच्या ठिकाणाची पाहणी केली. आज मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनेसंदर्भात बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड टनेलच्या गळतीबाबतची माहिती दिली.
"कोस्टलच्या टनेलमध्ये होणाऱ्या गळतीबाबत मी माहिती घेतली. मनपा आयुक्तांशी बोललो. टनेलच्या ग्राऊटींगमध्ये काही लिकेज आहेत. मुख्य बांधकामात कोणतीही गळती नाही. मूळ संरचनेला कोणताही धोका नाही. तिथे मनपा अधिकारी अमित सैनी, एलएनटीची टीम देखील पाहणीला गेली होती. आताही सर्व तज्ज्ञ मंडळी तिथं आहेत. जी काही दुरुस्ती करायची आहे ती कायमस्वरुपी असली पाहिजे. तात्पुरती असता कामा नये असे आदेश मी दिले आहेत", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कोस्टल रोडमुळे वरळी सी फेस ते मरीन ड्राईव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास दहा ते पंधरा मिनिटांत होण्यास मदत होत आहे. या मार्गावर प्रतितास ८० किमी वेगाने वाहन चालवण्याची, तर बोगद्यातून प्रतितास ६० किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १४ हजार कोटी रुपये आहे. मात्र, सेवेत आल्यानंतर दोनच महिन्यांनी टनेलमध्ये गळती सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.