Join us  

मुंबई कोस्टल रोड आजपासून दोन दिवस वाहतुकीसाठी बंद; वाहतूक विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 6:40 PM

मुंबईतील कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

Mumbai Coastal Road : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज रस्ता या नावाने ओळखला जाणारा मुंबई कोस्टल रोडबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वरळी ते नरिमन पॉईंट अंतर काही मिनिटांत पार करणारा मुंबई कोस्टल रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत कोस्टल रोड वाहतुकीसाठी अंशत: बंद राहणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर असे दोन दिवस मुंबई कोस्टल रोड वाहतुकीसाठी अंशत: बंद राहणार असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज रोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडवरील तांत्रिक कामामुळे, दक्षिणेकडील बोगदा ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन डीजी संचांची चाचणी घेण्यात येणार आहे, ज्यासाठी वाहतूक दक्षिणेकडील बोगद्याच्या डाव्या बाजूला जाण्याची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अमरसन्स गार्डनमधून बाहेर पडावे आणि मुकेश चौक आणि एनएस पाटकर रोड मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जावे, असे पोलिसांनी सांगितले.

वरळी ते मरीन ड्राइव्ह हा कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग ११ मार्च रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला होता. कोस्टल रोडचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले आणि ते चार वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र, संपूर्ण प्रकल्पाचे काम अद्याप बाकी असून, आता टप्प्याटप्प्याने हा रस्ता जनतेसाठी खुला करण्यात येत आहे.

सुमारे १४,००० कोटी रुपये खर्चाचा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-वरळी सी-लिंकला थेट जोडला जाईल अशी अपेक्षा आहे. यामुळे दक्षिण मुंबई आणि उपनगरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार असून आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडच्या जवळपास १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानचा बहुतांश रस्ता सध्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. या रस्त्यावर वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीये. 

टॅग्स :मुंबईमुंबई कोस्टल रोडमुंबई पोलीस