महाबळेश्वरइतकीच मुंबईही झाली थंड; आजही गारठा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:22 AM2020-02-01T05:22:58+5:302020-02-01T05:25:04+5:30
पुढील २४ तासांसाठी राज्यासह मुंबईचे किमान तापमान स्थिर राहील. गारठादेखील कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई : राज्यात शुक्रवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले, तर मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १३.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथील वेधशाळेत १३.८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असून, नव्या वर्षातले हे आतापर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान आहे.
गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारीही किमान तापमानाने हाच कित्ता गिरविला. किमान तापमान स्थिर राहिल्यामुळे मुंबईचे महाबळेश्वर झाले असून, महाबळेश्वरचे किमान तापमानही शुक्रवारी १३.३ अंश नोंदविण्यात आले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरातही किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. परिणामी शहर आणि उपनगर दोन्ही गारठले आहे. पुढील २४ तासांसाठी राज्यासह मुंबईचे किमान तापमान स्थिर राहील. गारठादेखील कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
१ आणि २ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान २८, १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर १ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २ आणि ३ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ४ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शुक्रवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ११.३
जळगाव ११.२
महाबळेश्वर १३.३
मालेगाव ११.२
नाशिक १०.८
सातारा १३.२
उस्मानाबाद १०.६
औरंगाबाद ११.९
परभणी ११.९
अकोला ११.२
अमरावती ११.२
बुलडाणा ११.६
ब्रह्मपुरी १२.३
चंद्रपूर १२.६
गोंदिया १०.५
नागपूर १२.२
वाशिम १२
वर्धा १२
यवतमाळ १३