चालू हंगामातील नीचांक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १५ अंश नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हा आतापर्यंतचा नीचांक आहे. विशेषत: कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. खाली घसरलेल्या तापमानामुळे रात्री, पहाटे आणि दुपारीही येथील वातावरणात गारवा जाणवत आहे. मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानानुसार माथेरानपेक्षा मुंबई अधिक थंड आहे. माथेरानचे किमान तापमान १७ तर मुंबईचे १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यात तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे येथील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने किमान तापमान खाली घसरले आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईचे किमान तापमान मंगळवारी खाली उतरेल, अशी शक्यता हवामान खात्याने सोमवारी रात्री व्यक्त केली होती. सोमवारी रात्री ९ वाजता शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी गार वारे वाहत होते. सोमवारी मध्यरात्री १२ वाजता यात आणखी भर पडली. बीकेसी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, विद्याविहार, पवई, मुलुंड, नेरूळ आणि पनवेल या परिसरातील किमान तापमान मंगळवाारी १५ अंश नोंदविण्यात आले असून, नववर्षाच्या स्वागताआधीच पडलेल्या थंडीने मुंबईकर गारठले आहेत.
* विदर्भातील तापमानातही घसरण
मुंबईतल्या अंतर्गत भागात किमान तापमान मोठ्या प्रमाणावर खाली घसरत आहे. २४ तासांसाठी असेच वातावरण कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मंगळवारी मुंबईत नोंद झालेला १५ अंश सेल्सिअस हा किमान तापमानाचा पारा म्हणजे चालू हंगामातील नीचांक आहे. विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून, कमाल तापमान ३० तर किमान तापमान १२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
* शहरांचे मंगळवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
सांताक्रुझ १५, ठाणे १७, रत्नागिरी १८.२, डहाणू १३.२, माथेरान १७, पुणे १३.१, बारामती १४.१, सातारा १५, महाबळेश्वर १४.९, सांगली १६.८, मालेगाव १२.४, नाशिक ११.८, जळगाव १०.६, बीड १६, औरंगाबाद १२.४, जालना १३.८, परभणी १३.८, उस्मानाबाद १४.३, जेऊर १४, नांदेड १२.५