मुंबई : मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १५ अंश नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हा आतापर्यंतचा नीचांक आहे. विशेषत: कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. खाली घसरलेल्या तापमानामुळे रात्री, पहाटे आणि दुपारीही येथील वातावरणात गारवा जाणवत आहे. मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानानुसार माथेरानपेक्षा मुंबई अधिक थंड आहे. माथेरानचे किमान तापमान १७ तर मुंबईचे १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यात तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे येथील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने किमान तापमान खाली घसरले आहे.ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईचे किमान तापमान मंगळवारी खाली उतरेल, अशी शक्यता हवामान खात्याने सोमवारी रात्री व्यक्त केली होती. ती खरी ठरली. बीकेसी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, विद्याविहार, पवई, मुलुंड, नेरूळ आणि पनवेल येथे किमान तापमान मंगळवाारी १५ अंश हाेते. नववर्षाच्या स्वागताआधीच पडलेल्या थंडीने मुंबईकर गारठले आहेत.