Join us  

मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 6:10 AM

गणेश मंडपात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेले भाविकही अडकून पडले. 

मुंबई/ ठाणे/ डोंबिवली : संध्याकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने महानगरी मुंबई कोलमडून पडली. रेल्वे वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. लोकल पाऊण ते एक तास उशिराने धावत होत्या. रस्त्यांवर पाणी तुंबल्याने जागोजागी वाहतुकीची कोंडी झाली. पारसिक बोगद्याजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ दिवा- ठाणे वाहतुकीला फटका बसला. गणेश मंडपात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेले भाविकही अडकून पडले. 

गुरुवारी दिवसभर ऊन होते; पण संध्याकाळी आभाळ दाटून आले आणि विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळू लागल्या. ठाणे, कळवा. मुंब्रा, कल्याण येथे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आणि रेल्वे वाहतूक मंदावली. मुंब्रा येथे डोंगरावरून वाहणारे पाणी सुसाटत शहरात शिरले आणि अनेक वाहने वाहून गेली. दुकानात पाणी शिरले. मुंबईत दादर, वरळी, शीव, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार वृष्टी झाली. सखल भागात पाणी तुंबले. गोरेगावमध्ये रस्ते जलमय झाले. मालाड, अंधेरी, खार येथेही सखल भागातही पाणी साचले. त्यामुळे बेस्टची वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली.  

रेल्वेकडून सुरक्षा तैनात- गाड्या रखडल्याने प्रत्येक स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याने रेटारेटी, चेंगराचेंगरीची वेळ आली.- भरून येणाऱ्या गाड्यात चढता येत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांचा अंदाज घेत रेल्वेने सर्व स्थानकांत रेल्वे पोलीस, सुरक्षा दल तैनात केले होते. 

 मुंबईत कुठे साचले पाणी?भायखळा पोलीस स्टेशन, जेजे उड्डाणपूल, मीनारा मशीद जंक्शन, दादर रेल्वे स्टेशन, दादर टीटी, बावला कंपाउंड, गोलदेऊळ, कपडा गल्ली, हिंदमाता जंक्शन, खेरवाडी, ग्रँटरोड पूर्व, उरणवाला स्ट्रीट, अलीभाई प्रेमजी मार्ग, ग्रँट रोड पश्चिम, कॉटन ग्रीन, अंधेरी सब वे, मालाड सब वे,चेंबूर आदी परिसरात पाणी साचले होते. 

टॅग्स :मुंबईपाऊसगणेशोत्सवलोकल