Join us  

मुंबई काँग्रेसची महाजम्बो कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:07 AM

मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मुंबई काँग्रेसच्या नव्या महाजम्बो कार्यकारिणीची रविवारी घोषणा करण्यात आली. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ ...

मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मुंबई काँग्रेसच्या नव्या महाजम्बो कार्यकारिणीची रविवारी घोषणा करण्यात आली. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव आणि ३० कार्यकारी सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता यानिमित्ताने घेतली गेली आहे.

गेल्यावर्षी १९ डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला. नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची आज दिल्लीतून घोषणा झाली. काँग्रेस कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबई काँग्रेस कार्यकारिणी आणि जिल्हा कमिट्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सांगत महासचिव के. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.

आज जाहीर झालेल्या नव्या कार्यकारिणीत सर्वच गटांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव आणि ३० कार्यकारी सदस्यांसोबतच जिल्हा काँग्रेस कमिटीतील नावेही जाहीर करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्हा अर्थात मुंबईतील लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील या सहा कमिट्यात प्रत्येकी एक अध्यक्ष आणि दोन कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे सर्वच गटांना - नेत्यांना सामावून घेताना मोठ्या प्रमाणावर पदे वाटली गेली आहेत.